Saturday, 3 February 2024

Sunday, 3 November 2019

पाय आज बांधावर पोचला!





ओल्या दुष्काळामुळे का होईना,
विधानसभेतला पाय आज बांधावर पोचला.
बळीराजाला धीर देता-देता,
सत्तास्थापनेचा पाढाच यांनी आज बांधावर वाचला.

पाहणी कसली? थट्टा करताय बांधावर येऊन,
भाषणं कसली झाडतांय? मदत करायची सोडुन.

पोकळ आश्वासनं कसली देताय?
निवडुन गेलात ते काम तरी नीट करा.
चांगले रस्ते, मुबलक बाजारपेठा, योग्य तो भाव,
यासाठी काहीतरी धडपड करा.

काही मदत नाही भेटली, तरी धरणारंच आहे वाट तो रोजची.
अन्नदाता म्हणुन जबाबदारीच आहे ना त्याची!   

Thursday, 6 June 2019

ध्येयाकडे तु चाल..




शेवटी अपेक्षांचं वादळ ते, मनासारखं थोडीच वागणार.
अखेर दिशाहिन असं तुफान ते, तुला ध्येयाकडे थोडीच नेणारं.

या सगळ्यांत, तु मात्र, होडी सांभाळ. उडणारे पाल, तु फ़क्त घट्ट बांध.
नाहीतरी हेलकावे खायलाचं, जन्म तिचा. शक्य तेवढं, शांत राहुन, ध्येयाकडे तु चाल. 

Tuesday, 26 February 2019

मी विचारात आहे!



मी शांत नाही, तर विचारात आहे.
गुंता-गुंतीचे फक्त जरा कोडे सोडवत आहे.

तुफान वादळ, उंच लाटा उच्छाद मांडत आहेत.
मी मात्र, कसोशीने, माझे 'पाल' तरंगवत आहे.  

Saturday, 17 March 2018

परतीच्या तु पावसा

परतीच्या तु पावसा,
कळे न मला तु असा कसा?
करुनी राडा वळणा-वळणावरी,
करतोस जीव तु वेडा-पिसा.

बघुन वादळ गोल-गोल फिरणारे,
चलते पाऊल थांबविले.
पाहून संकट येणारे,
पळते मन माझे आवरले.

पाडुन धारा, सांडुनी गारा,
चिखल तु का बनवावा?
येऊन थडक, देऊन धडक,
धीर असा का तोडावा?

गारांमध्ये रपेटलेले,
मन कसे मी मनवावे?
वाऱ्यामध्ये बिथरलेले,
पाऊल पुढे कसे मी ढकलावे?

Monday, 31 July 2017

बावरे मन...



बागडणाऱ्या चंचल मनाला,
निवांत थोडे बसवा. 
हिरमुसणाऱ्या निरागस मनाला,
क्षणभर थोडे हसवा. 

काय म्हणते कुणास ठाऊक,
जेव्हा हे गडबडते. 
उगाच करते कुणास भावुक,
जेव्हा हे थरथरते. 

अथांग याच्या इच्छा-आकांक्षा,
थेट गगनास जाऊन भिडते. 
क्लिष्ट याच्या युक्त्या-शकली,
बुचकळ्यात हरून पडते. 

बिथरलेल्या कापऱ्या मनाला,
विश्वासाच्या वनराईत पाठवा. 
भरकटलेल्या एकट्या मनाला,
जरा, मायेच्या डोहात नेऊन बसवा.   

Friday, 16 June 2017

शेतकरी संपावर गेला तर?













शाळेतील तिमाही-सहामाही परीक्षेत अनेक निबंध लिहिल्याचं आठवतं. सुर्य संपावर गेला तर? पाऊस संपावर गेला तर, वगैरे वगैरे. पण, एके दिवशी 'शेतकरी संपावर गेला तर' यावरही कधी काळी लिहावं किंवा बोलावं लागेल, अशी तसूभर कल्पनासुद्धा मनात आजवर कधी आली नव्हती. 

असो, हे वास्तवात घडतंय हे ऐकुन, वाचुन माझं गावठी मन हेलकावे घेऊ लागलं. गावच्या प्राथमिक शाळेत असताना, रोज सकाळ-संध्याकाळ रानात रमणाऱ्या बालमनाचा मी. अवघ्या तीन-चार कुदळीत पाटाच्या पाण्याला कांद्यातुन-मिरच्यांत, मिरच्यांतून-लसूणात, असा बोटावर नाचवणारा मी. दोन गोणी मिरच्या, एक गोणी कांदे, पिशवीभर लसूण आठवडी बाजारात पार तळपत्या उन्हात विकुन जेमतेम सात-आठशे रुपये आईच्या हातावर ठेवणारा मी. वार्षिक गुणपत्रिकेवरच्या टक्क्यांपेक्षा, काढणीनंतर भरणारी शेतमालाची गोणी आणि त्याला मिळणारा बाजार-भाव यात अधिक रस ठेवणारा मी. 

होय 'भाव'. ज्वारी, तुरीसारख्या पारंपरिक पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही, म्हणुन अनेक शेतकरी माय-बापड्यांनी सोयाबीनसारखी आधुनिक पिकं अंगवळणी पाडुन घेतली. तरी परिस्थिती तीच. 
कोण ठरवतो कोण नक्की भाव हा?
अहो नसेल जमत आमच्या शेतकऱ्याला 'ब्रॅंडिंग' का काय ते करायला, म्हणुन त्याला मुर्ख-लाचार समजण्याची चुकभूल तुम्ही पांढरपेशी जाणते तरी करू नका. ते काम राजकारणी लोक स्वतःच्या भाकऱ्या भाजण्यासाठी गेली वर्षानुवर्षे करत आलेले आहेतच, ते त्यांच्याच ताटात राहू द्या. 
पण, एक मात्र निश्चित! ज्या दिवशी आमच्या शेतमालाची देवगडच्या हापूससारखी 'ब्रॅंडिंग' होईल ना, तुम्हां शहरी लोकांना नाही कि हो परवडायचे 'ग्रीन-सॅलड' का काय ते. 'मेन-कोर्स' पेक्षा तेच महाग मिळेल मग. 
शेतकरी संप हा चूक होता की बरोबर? तो खराखुरा-प्रामाणिक आक्रोश होता की फक्त एक राजकीय डावपेच? या राजकीय विष्लेशनाकडे 'न' वळता, काय करता येईल यावर बोलणं मला अधिक महत्वाचं वाटतं. 

शेतमालाच्या किंमती या 'मागणी-पुरवठा' या एकाच रामभरोसे तत्वावर विसंबून न ठेवता, लागणाऱ्या खर्चावर (इनपुट कॉस्ट) पण अवलंबुन असाव्यात. ते परिमाण एक सर्वव्यापी स्वरुपाचे असावे, जे खत-बियाणे, औषधे, मजुरी, वाहतुक इत्यादी बाबींचा विचार करून बनवलेले असेल. 
हे अंमलात कसं आणता येईल, यावर आपण सर्व नक्कीच विचारमंथन करू शकतो व बळीराजाचं राज्य काही अंशतः का होईना पण या कलियुगात आणु शकतो.        












Saturday, 14 January 2017

आज पतंग उडवु चला...















सुट्टीच्या या ऊनाड दिवशी,
आज सैराट दौडु चला.
संक्रांतीच्या या मंगल दिवशी,
आज पतंग उडवु चला.

पाठी-दफ्तर घरात फेकुन, 
आज शिवार तुडवु चला,
व्याख्या, सुत्रे, पाढे विसरुन,
आज पतंग उडवु चला. 

माळावरच्या सुसाट नदीत,
आज माश्यागत पोहू चला. 
माळावरच्या हिरव्या धुंदीत, 
आज पतंग उडवु चला. 

रोजच्या हॉर्लिक्स-कॉम्प्लान ऐवजी, 
आज बागेतील पेरू खाऊ चला. 
रोजच्या १० ते ५ शाळे ऐवजी, 
आज पतंग उडवु चला.  











Friday, 13 January 2017

घरटं...











केव्हातरी मला उड़ायचे होते, उंच उंच आकाशामध्ये.
कधीतरी मला भिजायचे होते, चिंब चिंब पावसामध्ये. 


                   कधीवर मी जगायचे होते, काटेरी त्या कुंपनामध्ये? 
                   कुठवर मी रुतायचे होते, दुहेरी त्या आसवांमध्ये?


अजुन किती वहायचे होते, ओझे जड़ त्या नात्यांचे?
अजुन किती खपायचे होते, बंध तुटुनही जिवांचे?


                  कुठवर अजुन चलायचे होते, ठार मारुन मन त्या मनाचे?
                  कुठवर अजुन पळायचे होते, मागे टाकुन क्षण त्या क्षणांचे? 


मलापण आता अडखायचे नव्हते, न टिकलेल्या बंधामध्ये. 
मलापण आता रहायाचे नव्हते, न राहिलेल्या घरटयामध्ये.


                 मला तर आता जिंकायचे होते, न संपणाऱ्या शर्यतीमध्ये. 
                 मला तर आता उड़ायचे होते, न संपणाऱ्या आकाशामध्ये.

Sunday, 1 January 2017

बदलुन टाक तु मला...



तुझ्या फुलांच्या माळानं,
तुझ्या केसांच्या जाळ्यानं,
गुंफुन टाक तु मला. 

तुझ्या कानातल्या बाळीनं,
तुझ्या ओठांच्या लालीनं,
रंगवुन टाक तु मला. 

तुझ्या कोमल स्पर्शानं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावानं,
भिजवुन टाक तु मला. 

तुझ्या गोड हसण्यानं,
तुझ्या प्रेमळ मायेनं,
फुलवुन टाक तु मला. 

तुझ्या खुळ्या नादानं,
तुझ्या करारी बाण्यानं,
जिंकुन टाक तु मला. 

तुझ्या सोज्वळ मनानं,
तुझ्या करून कायेनं,
पावण कर तु मला. 

तुझ्या निःस्वार्थ प्रेमानं,
तुझ्या बांधिल विचारानं,
माणुस कर तु मला. 
    
  
      


   

एक अंधारी वाट...





अंधाऱ्या त्या काळ्या राती,
का मला कशाची भिती?
सोबत असता सावलीची,
मग चिंता कसली काळोखाची?

'गडबडनं अन गोंधळनं',
गाठच नाही या शब्दांशी. 
श्वासागणिक सर करतोय वाट,
घेऊन कंदिल मी हाताशी. 

असतील वाटा काट्या-कुट्यांच्या,
वा असेल कळप साप-विंचवांचा. 
मोडुन क्लुप्त्या शेकडो संकटांच्या,
हा प्रवास नाही आता थांबायचा. 

कधीतरी जिंकेल मी शर्यतीत,
पाऊल टाकतोय, ही गाठ बांधून मनाशी. 
कधीतरी येईल उजेड क्षितिजावर,
चालतोय बाळगुन, ही आस उराशी.   




 

Tuesday, 9 February 2016

|| राजे मुजरा ||










चौफेर वारू उधळनाऱ्या अवघ्या मराठीजणांचा स्वाभिमान,
चार शतकांपरी आजही राजे तुम्हीच आमुचा अभिमान.

तुम्हीच बोवलेल्या निर्भिडतेमुळे,
लाभतोय माय मराठीला आज सन्मान.
कित्येक राजे मिरवुनि गेले आजवर,
तरी शिवराय तुम्हीच आमुचे प्रेरणास्थान.

पुन्हा शिवकालीन मावळा नाही होता येत, याचा किंचित वाटतो खेद,
पण, पदोपदी स्मरते तुमचीच शिकवण 'साम-दाम अन दंड-भेद'.

तुम्ही उभारलेल्या हिंदवी स्वराज्याची आज फक्त येतेय कीव,
पुन्हा एकदा मावळा व्हावसं वाटतंय, ऒवाळून टाकायला जीव.
राजे, मराठी मुलखाच्या काल-पटावरील कधीच न मिटणारा 'भगवा ठसा' आहात तुम्ही,
माझ्या मराठी मुलखाच्या, मराठी विचारांत, आजही जिवंत आहात तुम्ही.

काफिरांचे सदा परतुनी लाविले तुम्हीच राजे लोट,
सह्याद्रिच्या त्या मराठी इभ्रतेचे तुम्हीच राखिले गड-कोट.
तुम्हीच दिलेल्या सामर्थ्यानं खिळवतोय मी आज, साऱ्या जगाशी नजरा,
नतमस्तक होऊन विनवणी राजे, घ्यावा या मावळ्याचा मुजरा.
 



   

Saturday, 12 December 2015

आम्ही लहानपणी ऐकायचो...










आम्ही लहानपणी ऐकायचो आईकडून,
'बाबा' ऑफिसात काम कि ते करायला जातात. 
दिवस उजाडताच जे उंबऱ्यावर पडतात, 
ते पार, सुर्य मावळल्यावरच त्यांची पाऊले घराकडे वळतात. 
रोजची ही अशी त्यांची दिनचर्या, 
असं वाटतं कि, सुर्याचा वापर ते गजर म्हणुनच करतात. 

आम्ही बापुडे मात्र गजगे, सोंगट्यातच रमणार ना !
आमचं 'काम' ह्या शब्दाशी काय आणि कसलं कर्तव्य ?
बाबा सुद्धा क्रिकेट, बॅडमिंटन मध्ये सवंगडी व्हायचेच म्हणा,
पण आज जाणवतं आम्हाला, बाबांमुळेच तर शिकलोय आम्ही काम आणि कर्तव्य. 

आजही अगदी लख्ख आठवते, आमच्या घरात भरणारी आमची शाळा,
बाबा व्हायचे मास्तर, द्यायला आम्हाला ज्ञान आणि जिव्हाळा. 
आजही आठवतं, कित्येक क्लिष्ट गुंते, त्यांनी अगदी सहज उलघडून आम्हाला उमगावावे,
तर लसावि, मसावि - गुणोत्तर प्रमाण  हे सारं काही रोज अगदी लोणच्यासारखं आमच्या अभ्यासरुपी ताटात वाढवे.
 
लहान असताना कधी वाटलं पण नव्हतं, 
कि तुम्ही पिंजायला शिकवलेले ते ज्ञानाच्या कापसाचे धागे,
पुढे चालून आमच्या आयुष्याचे भक्कम खांब बनतील. 
तर चरित्र, मनन-चिंतन, निर्व्यसनाचे धडे आम्हाला पुर्ण आयुष्यभर पुरतील. 

घरादारासाठी खुप खस्ता खणल्यात तुम्ही मागील कित्येक वर्ष,
फक्त सुखच नव्हे, तर सगळ्यांच्या जीवनात अगदी भरभरून ओतलाय तुम्ही हर्ष. 
आज तुम्ही निवृत्त होताय, 
खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर, आयुष्यातील एक नवं पर्व तुम्ही सुरू करताय. 

तुमचा पुर्ण वेळ आता आम्हा सर्वांना मिळणार, 
हि कल्पनाच अचाट आनंद देणारी आहे. 
काम करून दमलात ना बाबा तुम्ही इतके दिवस,
या आता… विश्रांती घ्यायला घटकाभर,
सारं घर डोळ्याची पार निरांजनं करून तुमची वाट पहात आहे. 
खरंच बाबा, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच… 



 



 



  
 

Tuesday, 1 December 2015

आत्ताच ऊजाडले होते...












तपभर काळोखानंतर कुठे आत्ताच ऊजाडले होते,
नव्या प्रारंभाचे 'पण' मी आत्ता पहाटेच बांधले होते. 
पुर्णत्वाचे उत्स्फुर्त क्षण मज आत्ताच जगावयाचे होते,
पण, विस्तवांचे लाल भडक ढग नभात, आत्ताच का, जमावयाचे होते ?

हवं तसं जगताच नाही आलं कधी !
जगणे हे फक्त विचारांच्या आराखड्यातच राहिले. 
हवं तसं घरटं विनताच नाही आलं कधी,
विणलेले गवताचे तंतु अहंकारातंच विरले. 


काय होतं माझ्या हातात तरी ?
सद्हेतुपुर्वक समजाविण्यापलिकडे. 
कोणा-कोणाला सावरायचं तरी ?
सारंच वाहतं जेव्हा आवरण्यापलिकडे.         

काळ प्रतारणा करून सहज हसला,
मी मात्र, निमग्नपने वादळांचे 'हलाहल' प्यायलो.
आल्हाददायी वेळ निमुटपणे रुसुन बसला,
मी मात्र, नव्या जोमाने त्याला विनवायला, काथ्याकुट करायला उठलो. 


Thursday, 19 November 2015

उरुण पुरेल हे रक्त मराठी...










नाठाळांच्या माथी हाणायला काठी,
उरुण पुरेल हे रक्त मराठी।  
उभं आयुष्य बांधतात आपुलकीच्या गाठी,
सह्याद्रिच्या कड्या-कपाऱ्यातुन सळसळणारे वाघ मराठी ।।  

Wednesday, 4 November 2015

विचार - एका नव्या सुरुवातीचा













मी विचार केला होता एका वेगळ्याच शेवटाचा,
पण आता, पायाच भरावा लागणार आहे, एका नव्या सुरुवातीचा। 
गलबतं तर दिशाहिन होणारंच, जेव्हा वारेच फिरायला लागतात,
घरटी पण पोरकी होणारंच, जेव्हा पाखरंच उडायला लागतात

गावची पायवाटंच बरी होती,
सुखं-दुखात वाटेकरी म्हणुन का होईना, निदान वाटसरू तरी असायचे
काय अवदशा या महामार्गांची,
राव असो वा रंक, एकट्यानेच जगायचे आणि एकट्यानेच मरायचे

का नाहीत ढासळणार विश्वासाचे बुरुज ?
आणखी किती तग धरावी तरी त्यांनी ?
दौलतीचा डौलबाज गड राखायला,
शिलेदार व्हावं ना साऱ्या जीवलगांनी

वर्षानुवर्षे जपलेली नाती, आज एका क्षणात तोडली जातात,
अहंकाराची गाठोडी वाहात, आज लोक जिवंतपणी मरतात
याच साठी का करतात सारा काही अट्टहास ?
सारं कळतं, शिवाय नात्यांमधील मिठहास

शेवटी सारं काही मातीतच जात असलं तरी,
सद्विचारांचे थरावर-थर चढवुन, कर्तुत्वाचा 'टोलेजंग' वाडा मी बांधणार।
कितीही वादळं आली तरी,
पुन्हा नव्याने कल्पकतेच्या काड्यांनी, मायेचा खोपा नवा मी विनणार     

Friday, 23 October 2015

मला कधी कळलंच नाही...














तु का निघुन गेलीस, मला कधी कळलंच नाही । 
तुझ्यानंतर, तुझ्यासारखं कोणी आयुष्यात कधी आलंच नाही ।।
तुझ्याइतकं मन नंतर कधी कुठे रमलंच नाही । 
पहिल्यासारखं हसू देखील नंतर कधी फुटलंचं नाही ।।  
   
कित्येक दिवस झाले, स्वतःला स्वतःच्या नजरेतुन मी साधं पाहिलं पण नाही ।
कारण, काळोखात बळ देणारा आशावादी ऐनक फक्त तुच होतीस ।।
कित्येक दिवस झाले, खुल्या डोळ्यांनी मी पहाटेचं स्वप्न सुद्धा पाहिलं    नाही । 
कारण, सोनेरी पहाटेच्यावेळी लागणारी सुखाची साखरझोप फक्त तुच होतीस ।।

बुचकुळ्यात पडतो मी आजकाल, 'काय तेव्हा करायला हवं होत ?' 
वाट्याला जेवढी आली होतीस, त्यालाच गोड मानायला हवं होत ।।
खरंतर मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपायला हवं होत । 
तु वाट चुकली म्हणुन, काटेरी झालंर तुझ्यासमोर अंथरायला मी नको होत।।

आभाळभर मोकळा श्वास घ्यायचाय मला, कायमचा श्वास थांबण्या-अगोदर । 
मनसोक्त बागडायचंय मला 'आयुष्याच्या रंगमंचावर', रंगनाट्य कायमचं संपण्या-अगोदर ।।
काय माहीत, तुझ्याविना हे सारं काही होणार तरी कसं ?
मीठंच हरवलंय आता, काय माहीत आयुष्याचं वरण चवदार लागणार तरी कसं ।।          

        
 
 

Tuesday, 8 September 2015

तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल...










तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  
तुला आठवतं?
नदीकाठी आपण फिरायला जायचो,
निळ्याशार  अश्या  पाण्यात आपली प्रतिमा न्याहाळत बसायचो.
निळंशार असं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजायचं,
आणि माझ्या अपयशाच्या ओझ्याने ते नदितंच बुडून जायचं
आजही तु अगदी तसंच, निळ्याशार पाण्यात पाहून इंद्रधनुसारखं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजवंत असशील,
नदीकाठा ऐवजी फक्त एखादा आकर्षक 'Beach' असेल, फरक एवढाच,
पण,  ते स्वप्न त्याच्या गर्भ-श्रीमंतीच्या वावटळीत हरवून तर जात नाही ना ?  
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  

तुला आठवतं?
आपण देवळात जायचो,
तु गाभाऱ्यात बसुन असायचीस डोळे मिटून, तासनतास...
माझ्या यशासाठी गाह्राणं गात बसायचीस.
मी मात्र देवळाबाहेर तुझी वाट बघायचो,
नशिबापेक्षा कर्तुत्वावरंच जास्त मी विश्वास ठेवायचो.
नास्तिक म्हणून, तु सतत माझ्यावर नाराज होत असायचीस.   
आजही तु तशीच कुठेतरी डोळे मिटून बसत असशील, तासनतास...
देवळाच्या गाभाऱ्या ऐवजी फक्त एखादं महागडं 'Apartment' असेल, फरक एवढाच.
पण त्या गाह्रान्यांचं काय गं ?
आजही त्या गाह्रान्यांत, धुरकटसा तरी मी असतो ना ? 
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 

नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  

Saturday, 29 August 2015

“आयुष्य” हे असंच असतं जगायचं…


गावच्या ऒढ्यात मनसोक्तपणे पोहायचं,   
पेरू-बोरं शोधत शिवारभर हिंडायचं. 
वर्गातील खोड्या-मोड्या अन दादागिरीलाच प्राथमिक शिक्षण समजायचं,  
वर्गाबाहेर मात्र न चुकता कधी कोंबडा तर कधी पायाचे अंगठे धरून कांगारू बनुन जायचं.

एरवी अपुऱ्या गृहपाठ-वर्गपाठापायी आई पुढे सतत तोंड लपवायचं,
पण, दसरा-दिवाळीला मात्र तिच्याचभोवती अगदी मधमाशी सारखं रेंघाळायचं.
मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास वाट्टेल ते तोडायचं-फोडायचं,
नासधुस पाहुन आईच्या डोळ्यात जमलेलं पाणी बघुन, स्वतःच पुन्हा तिच्या कुशीत जाऊन 'मुळूमुळू' रडायचं,
मग, गालावरचा एक गोड पापा अन 'माझं गुणी बाळ ते', ऐकुन भरल्या डोळ्यांनाच हसु फुटायचं.
दिवाळीचा फराळ बनताना 'सुगरण' आईसमोर लगीनघाईगत पुढे-पुढे ‘मी’ करायचं.

सोमवारच्या बाजाराहुन परतणाऱ्या आज्याचा वाटाड्या ‘मी’ बनायचं,
पिशवीतल्या पेढा-लाडु अन शेव-चिवड्याला घश्याखाली सरकवून कोवळ्या जीवाला धन्य करायचं.
माजघरातुन बालवाडीच्या अंगणात उतरायला आजोबाच्या खांद्यालाच 'विमान' बनवायचं,
चुलीवरच्या भाजक्या शेंगदाण्याची आगाऊ 'मुठ' मिळवायला आजीलांच 'वेठीस' धरायचं. 
सीमेवर 'कडा' पहारा देणाऱ्या 'बाबाला', नवी 'सायकल' हवी म्हणुन 'पत्र' लिहायचं, 
सणावाराला काका-काकु सोबत गावी येणाऱ्या मोठ्या भावापुढे, बुद्धीबळ-सापशिडी संचासाठी गाऱ्हाण गायचं. 

शाळेपुढच्या पकडा-पकडीत ‘जिंकुन’ सारखं स्वतःच्या चपळाईला नावाजयचं, 
तर गल्लीतील सायंकाळच्या लपाछपित हरवुन, रोज नव्याने स्वतःला शोधायचं. 
कधी कविता तर कधी पाढ्यांच्या घोकमपट्टीतून आपल्या तल्लग बुद्धीचं प्रदर्षण करायचं,
दरवर्षी निकालादिवशी प्रगती पत्रकावरचा 'प्रथम' क्रमांक घराबाराला दाखऊन, साऱ्यांच्या अंगावर 'मुठभर' मांस चढवायचं.   
शनिवरच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेला, मनात नसतानाही पहाटेचं उठायचं,
पण, शाळा सुटतांच, 'शक्तिमान' बघायला, घराकडे दणाणुन पळायचं.  
गुणी-संस्कारी मुलगा म्हणुन घेण्यापेक्षा ‘गोट्या-कोयांच्या’ खेळातंच अट्टल नेमबाज बनायचं,
इवल्या-बावल्या कारणाहून गल्ली-बोळात होणाऱ्या मस्तीतुन, ‘आठवडी बाजारासारखं’ एकतरी भांडण विकत घरी आणायचं.    

कधी तळ्यात तर कधी मळ्यातल्यासारखं, कधी आपल्या, तर कधी मामाच्या घरी राहायचं,
ऐन ऋतुमध्ये, पावसाळी पक्ष्यासारखं आंबा-पेरूच्या बागेतंच रमायचं.  
पेरणी-कुळवणी सोबतंच गाडी-बैला संगत एकरूप व्हायचं,
सणा-सुदीला आमरस-पोळी आणि आमटी भाताला वरपायचं,
कधी ठेचा तर कधी चटणीने रब्बीतल्या हुर्ड्याला अधिक चविष्ट बनवायचं. 

'मुंबई' पुढे जग संपतं, यालाच खरं मानायचं,
भुता-प्रेताच्या गोष्टी ऐकून, ‘अंधारात’ एक साधं पाऊल सरकवायलाही घाबरायचं.
मोठेपणी सुखाच्या नावाखाली फक्त पैसा कमवत राहायचं,
आणि ज्ञानेश्वरांच्या सुरात सुर मिसळुन आज, 'लहानपण देगा देवा' असंच म्हणायचं...
खरंच.. आयुष्य हे असंच असतं जगायचं,
पळता-पळता कधी धापकन पडायचं.
पण, दुनियादारी ची तमा न बाळगता, पाठीचा मणका ताठ करून उभं रहायचं,
ताज्या उमेदीचा हंभरडा फोडुन, पुन्हा एकदा वाऱ्यासारखं धावत सुटायचं.