बागडणाऱ्या चंचल मनाला,
निवांत थोडे बसवा.
हिरमुसणाऱ्या निरागस मनाला,
क्षणभर थोडे हसवा.
काय म्हणते कुणास ठाऊक,
जेव्हा हे गडबडते.
उगाच करते कुणास भावुक,
जेव्हा हे थरथरते.
अथांग याच्या इच्छा-आकांक्षा,
थेट गगनास जाऊन भिडते.
क्लिष्ट याच्या युक्त्या-शकली,
बुचकळ्यात हरून पडते.
बिथरलेल्या कापऱ्या मनाला,
विश्वासाच्या वनराईत पाठवा.
भरकटलेल्या एकट्या मनाला,
जरा, मायेच्या डोहात नेऊन बसवा.
No comments:
Post a Comment