तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं
सहज एक आठवण
म्हणुन बोलतो.
तुला
आठवतं?
नदीकाठी
आपण फिरायला जायचो,
निळ्याशार
अश्या
पाण्यात
आपली प्रतिमा न्याहाळत
बसायचो.
निळंशार
असं स्वप्न तुझ्या
तांबुस डोळ्यात सजायचं,
आणि
माझ्या अपयशाच्या ओझ्याने ते
नदितंच बुडून जायचं.
आजही
तु अगदी तसंच,
निळ्याशार पाण्यात पाहून इंद्रधनुसारखं
स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात
सजवंत असशील,
नदीकाठा
ऐवजी फक्त एखादा
आकर्षक 'Beach' असेल, फरक एवढाच,
पण, ते स्वप्न त्याच्या
गर्भ-श्रीमंतीच्या वावटळीत
हरवून तर जात
नाही ना ?
तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं
सहज एक आठवण
म्हणुन बोलतो.
तुला
आठवतं?
आपण
देवळात जायचो,
तु
गाभाऱ्यात बसुन असायचीस डोळे मिटून, तासनतास...
माझ्या
यशासाठी गाह्राणं गात बसायचीस.
मी
मात्र देवळाबाहेर तुझी वाट बघायचो,
नशिबापेक्षा
कर्तुत्वावरंच जास्त मी विश्वास ठेवायचो.
नास्तिक
म्हणून, तु सतत माझ्यावर नाराज होत असायचीस.
आजही
तु तशीच कुठेतरी डोळे मिटून बसत असशील, तासनतास...
देवळाच्या
गाभाऱ्या ऐवजी फक्त एखादं महागडं 'Apartment' असेल, फरक एवढाच.
पण
त्या गाह्रान्यांचं काय गं ?
आजही
त्या गाह्रान्यांत, धुरकटसा तरी मी असतो ना ?
तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.
No comments:
Post a Comment