Tuesday, 8 September 2015

तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल...










तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  
तुला आठवतं?
नदीकाठी आपण फिरायला जायचो,
निळ्याशार  अश्या  पाण्यात आपली प्रतिमा न्याहाळत बसायचो.
निळंशार असं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजायचं,
आणि माझ्या अपयशाच्या ओझ्याने ते नदितंच बुडून जायचं. 
आजही तु अगदी तसंच, निळ्याशार पाण्यात पाहून इंद्रधनुसारखं स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात सजवंत असशील,
नदीकाठा ऐवजी फक्त एखादा आकर्षक 'Beach' असेल, फरक एवढाच,
पण,  ते स्वप्न त्याच्या गर्भ-श्रीमंतीच्या वावटळीत हरवून तर जात नाही ना ?  
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 
नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  

तुला आठवतं?
आपण देवळात जायचो,
तु गाभाऱ्यात बसुन असायचीस डोळे मिटून, तासनतास...
माझ्या यशासाठी गाह्राणं गात बसायचीस.
मी मात्र देवळाबाहेर तुझी वाट बघायचो,
नशिबापेक्षा कर्तुत्वावरंच जास्त मी विश्वास ठेवायचो.
नास्तिक म्हणून, तु सतत माझ्यावर नाराज होत असायचीस.   
आजही तु तशीच कुठेतरी डोळे मिटून बसत असशील, तासनतास...
देवळाच्या गाभाऱ्या ऐवजी फक्त एखादं महागडं 'Apartment' असेल, फरक एवढाच.
पण त्या गाह्रान्यांचं काय गं ?
आजही त्या गाह्रान्यांत, धुरकटसा तरी मी असतो ना ? 
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल, 

नाही म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.  

Saturday, 29 August 2015

“आयुष्य” हे असंच असतं जगायचं…


गावच्या ऒढ्यात मनसोक्तपणे पोहायचं,   
पेरू-बोरं शोधत शिवारभर हिंडायचं. 
वर्गातील खोड्या-मोड्या अन दादागिरीलाच प्राथमिक शिक्षण समजायचं,  
वर्गाबाहेर मात्र न चुकता कधी कोंबडा तर कधी पायाचे अंगठे धरून कांगारू बनुन जायचं.

एरवी अपुऱ्या गृहपाठ-वर्गपाठापायी आई पुढे सतत तोंड लपवायचं,
पण, दसरा-दिवाळीला मात्र तिच्याचभोवती अगदी मधमाशी सारखं रेंघाळायचं.
मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास वाट्टेल ते तोडायचं-फोडायचं,
नासधुस पाहुन आईच्या डोळ्यात जमलेलं पाणी बघुन, स्वतःच पुन्हा तिच्या कुशीत जाऊन 'मुळूमुळू' रडायचं,
मग, गालावरचा एक गोड पापा अन 'माझं गुणी बाळ ते', ऐकुन भरल्या डोळ्यांनाच हसु फुटायचं.
दिवाळीचा फराळ बनताना 'सुगरण' आईसमोर लगीनघाईगत पुढे-पुढे ‘मी’ करायचं.

सोमवारच्या बाजाराहुन परतणाऱ्या आज्याचा वाटाड्या ‘मी’ बनायचं,
पिशवीतल्या पेढा-लाडु अन शेव-चिवड्याला घश्याखाली सरकवून कोवळ्या जीवाला धन्य करायचं.
माजघरातुन बालवाडीच्या अंगणात उतरायला आजोबाच्या खांद्यालाच 'विमान' बनवायचं,
चुलीवरच्या भाजक्या शेंगदाण्याची आगाऊ 'मुठ' मिळवायला आजीलांच 'वेठीस' धरायचं. 
सीमेवर 'कडा' पहारा देणाऱ्या 'बाबाला', नवी 'सायकल' हवी म्हणुन 'पत्र' लिहायचं, 
सणावाराला काका-काकु सोबत गावी येणाऱ्या मोठ्या भावापुढे, बुद्धीबळ-सापशिडी संचासाठी गाऱ्हाण गायचं. 

शाळेपुढच्या पकडा-पकडीत ‘जिंकुन’ सारखं स्वतःच्या चपळाईला नावाजयचं, 
तर गल्लीतील सायंकाळच्या लपाछपित हरवुन, रोज नव्याने स्वतःला शोधायचं. 
कधी कविता तर कधी पाढ्यांच्या घोकमपट्टीतून आपल्या तल्लग बुद्धीचं प्रदर्षण करायचं,
दरवर्षी निकालादिवशी प्रगती पत्रकावरचा 'प्रथम' क्रमांक घराबाराला दाखऊन, साऱ्यांच्या अंगावर 'मुठभर' मांस चढवायचं.   
शनिवरच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेला, मनात नसतानाही पहाटेचं उठायचं,
पण, शाळा सुटतांच, 'शक्तिमान' बघायला, घराकडे दणाणुन पळायचं.  
गुणी-संस्कारी मुलगा म्हणुन घेण्यापेक्षा ‘गोट्या-कोयांच्या’ खेळातंच अट्टल नेमबाज बनायचं,
इवल्या-बावल्या कारणाहून गल्ली-बोळात होणाऱ्या मस्तीतुन, ‘आठवडी बाजारासारखं’ एकतरी भांडण विकत घरी आणायचं.    

कधी तळ्यात तर कधी मळ्यातल्यासारखं, कधी आपल्या, तर कधी मामाच्या घरी राहायचं,
ऐन ऋतुमध्ये, पावसाळी पक्ष्यासारखं आंबा-पेरूच्या बागेतंच रमायचं.  
पेरणी-कुळवणी सोबतंच गाडी-बैला संगत एकरूप व्हायचं,
सणा-सुदीला आमरस-पोळी आणि आमटी भाताला वरपायचं,
कधी ठेचा तर कधी चटणीने रब्बीतल्या हुर्ड्याला अधिक चविष्ट बनवायचं. 

'मुंबई' पुढे जग संपतं, यालाच खरं मानायचं,
भुता-प्रेताच्या गोष्टी ऐकून, ‘अंधारात’ एक साधं पाऊल सरकवायलाही घाबरायचं.
मोठेपणी सुखाच्या नावाखाली फक्त पैसा कमवत राहायचं,
आणि ज्ञानेश्वरांच्या सुरात सुर मिसळुन आज, 'लहानपण देगा देवा' असंच म्हणायचं...
खरंच.. आयुष्य हे असंच असतं जगायचं,
पळता-पळता कधी धापकन पडायचं.
पण, दुनियादारी ची तमा न बाळगता, पाठीचा मणका ताठ करून उभं रहायचं,
ताज्या उमेदीचा हंभरडा फोडुन, पुन्हा एकदा वाऱ्यासारखं धावत सुटायचं. 

Friday, 7 August 2015

बळीराजा

















राजा कसला ? फक्त बळी उरलोय मी !
रसवंतीतल्या ऊसाचा पार चोथा बनलोय मी. 
धनी कसला ? घाण्याला बैलागत जुंपलो गेलोय मी !
बाजारात वारं-वार भावाची खोटी करून घेणारा 'लाचार' झालोय मी. 

रात्रं-दिवस रानात घाम मी गाळायचा. 
पण भाव मात्र,
गाद्या-गिरध्यावर बसणाऱ्या 'शेठ-साहेबांनी' ठरवायचा !

ऊन-वारा-पावसांत मी खपायचं, मी झटायचं !
रक्ताचं पाणी करून सोनं मी पिकवायचं. 
पण शेवटी,
मोटारीतून फिरणाऱ्या सुट-बूट वाल्यांनी भाव पाडून मलाच मातीमोल करायचं !

अजुन किती दिवस मला हे पांढरपेशी लोक किडा-मुंग्यागत गिणतील ?
'बळीराजा' तर सोडाच,
पण कधी मला माणसासारखी तरी वागणुक देतील ?

प्रश्नात्मक साकडं माझं तुला हे भगवंता,
पोरक्या झालेल्या माझ्या सऱ्या केव्हा बरं न्हाऊन निघतील ?
उदंड सामर्थ्य असलेल्या माझ्या मळ्यात, केव्हा बरं 'माणिक-मोती' पिकतील ?

घाई कर रे भगवंता,
डोंगराएवढे प्रश्न माझे क्षणभरात मिटतील. 
माझ्या पोटच्या लेकीच्या माथी 'बाशिंग-मुंडावळ्या' तरी सजतील !

काढ हा नियतीचा घाला 'पांडुरंगा', नाहीतर,
काळ्या मातीत राबणाऱ्याला 'आडमुठ' सारे ठरवतील. 
'भुमीपुत्र' म्हणुन घ्यायला उदया, आमची लेकरं तरी कशी धजतील ?   



   



       


  



        

Monday, 3 August 2015

माझी चिमुरडी














माझी चिमुरडी, म्हणजे देवाघरचं सर्वात सुंदर फुल । 
हिच्या सोबतीत पडते तहान भुकेचीही भूल ।।  
माझी चिमुरडी, म्हणजे विधात्याने सजवलेलं पहाटेचं एक सुंदर स्वप्न । 
हे स्वप्न उलघडण्यातंच सतत, मन माझं असतं मग्न ।।

इवलीशी असल्यापासुन हिच्याशी एकरुप केलंय मी स्वतःला,
चिऊघास-काऊघास भरवून कलेकलेने वाढवलंय मी हिला । 
हिच्या नयनलुब्ध रूपा-समोर हार मानावी लागेल एव्हाना पारीजातकाला,
बागेत स्वच्छंदपणे बागडून लाजवेल ही अगदी फुलपाखराला ।।

लपंडावात रमणारं हिचं हे कोवळं 'मन' एके दिवशी साज-शृंगारात  रमेल,
कमालिची धाव घेऊन, सासरी जाऊन आप्तबंधनातही गुंतेल । 
दिवाळीच्या दिव्यासारखं, मायेच्या उबेने दोन्ही घरांना ही दीपवेल,
प्रश्न पडतो एकंच, की 'तेव्हा हिला माझ्यासाठी वेळ उरेल ?'

बागंड सोन्या आत्ताच, फार कठोर आहे हे जग,
नांच 'थुई-थुई' मोरणीसारखी पिसारा फुलवून, मी बनतोय तुझ्या खातीर वसंतातील ढग । 
चिमुरडे, बघ जरा आजमावून… 
माझ्या मायेचं कुंपणदेखील उरून पुरेल तुला,
बसं, थोडी काळजी वाटते,
'माझ्या पश्चात सांभाळून घेईल का हे जग तुला ?'                         






Wednesday, 24 June 2015

स्वप्न पुन्हा मी बघतो...


नियतीच्या सापळ्यात,
मी अभिमाणाने पडतो । 
थोडा कळवळतो.. 
पण, उत्स्फुर्तपणे उठुन आशेचे 'पूल' पुन्हा मी बांधतो ।।  

माझ्या तळमळीच्या संकल्पांवर,
'का कुणांस ठाऊक' कसा काय काळाचा घाला पडतो ?
थोडा ढासळतो.. 
पण, मणक्यांत फौलादी बळ भरून नवे 'पण' पुन्हा मी रचतो ।। 

माझ्या गगण-भरारीच्या कल्पकतेवर, 
निंदकांच्या मिश्किल हास्याचा जेव्हा भडिमार होतो । 
थोडा खचतो..
पण, पंखांना तबकड्या बांधुन दुनियाची 'तमा' न बाळगता, 
'गरुडझेप' मी घेतो ।।

माझ्या इवल्या-इवल्या आशांचा,
स्वकीयांकडुनंच जेव्हा 'फडशा' पडतो ।   
थोडा हळहळतो..
पण, कंबर कसून काळपटावर एकट्यानेच धावायचे मी ठरवतो ।।

माझ्या योजिलेल्या 'शिडांचा' संच,
चक्रिवादळात जेव्हा सागर-तळास जातो । 
मी पार बुडतो, घुसमटतो..    
पण, नव्या उमेदीने समुद्र कापायला,
'गगणचुंबी पाल' नवे मी उभारतो ।।  

कल्पणेने रेखाटलेल्या माझ्या चित्रपटिचा,
जेव्हा 'चकणा-चुर' होतो । 
मी पार विखुरतो.. 
पण, प्रचंड आशावादी बनून ध्येयवेडे असे,
स्वप्न पुन्हा मी बघतो ।।    

       
     
    
      

Thursday, 11 June 2015

|| माझा राजा रांगडा ||




म्यान झालत्या तलवारी, 
तुफाण माजली होती गद्दारी ।
शिव-जन्मापुर्वी, देव नव्हता ऊरला हो  मंदिरी ।।
पार पोळली, भाजली होती हो मराठी रयत,
उसन्या अहंकारात मात्र, फुत्कारात होती मुगल सल्तनत ।।

मिटवायला काफिरांचा बोकाळलेला हाहाकार,
करायला मराठी जन-माणसाचा उद्धार ।
कड्या-कपाऱ्यातुन सळसळला माझा राजा, 
घेऊन धारोष्ण रक्ताची तलवार ।।  

काफिरांना शिकवायला गानिमिकाव्यातून धडा,
भरून काढायला 'मराठी' अस्मितेला गेलेला तडा ।
भीष्मा-सारखा कणखर, राहिला माझा राजा खडा ।।

जुलमाच्या त्या हिरव्या जंगलात, भडकवायला वणवा,
सह्याद्रिच्या त्या ऎटदार  कुशीत फडकवायला भगवा ।
जन्मला माझा राजा रांगडा ।।

दक्खनच्या शाह्यांची उडवायला रणधुमाळी,
वसवायला भगवंत अन भवानी-माता राऊळी ।
अवतरला माझा राजा रांगडा ।।