राजा कसला ? फक्त बळी उरलोय मी !
रसवंतीतल्या ऊसाचा पार चोथा बनलोय मी.
धनी कसला ? घाण्याला बैलागत जुंपलो गेलोय मी !
बाजारात वारं-वार भावाची खोटी करून घेणारा 'लाचार' झालोय मी.
रात्रं-दिवस रानात घाम मी गाळायचा.
पण भाव मात्र,
गाद्या-गिरध्यावर बसणाऱ्या 'शेठ-साहेबांनी' ठरवायचा !
ऊन-वारा-पावसांत मी खपायचं, मी झटायचं !
रक्ताचं पाणी करून सोनं मी पिकवायचं.
पण शेवटी,
मोटारीतून फिरणाऱ्या सुट-बूट वाल्यांनी भाव पाडून मलाच मातीमोल करायचं !
अजुन किती दिवस मला हे पांढरपेशी लोक किडा-मुंग्यागत गिणतील ?
'बळीराजा' तर सोडाच,
पण कधी मला माणसासारखी तरी वागणुक देतील ?
प्रश्नात्मक साकडं माझं तुला हे भगवंता,
पोरक्या झालेल्या माझ्या सऱ्या केव्हा बरं न्हाऊन निघतील ?
उदंड सामर्थ्य असलेल्या माझ्या मळ्यात, केव्हा बरं 'माणिक-मोती' पिकतील ?
घाई कर रे भगवंता,
डोंगराएवढे प्रश्न माझे क्षणभरात मिटतील.
माझ्या पोटच्या लेकीच्या माथी 'बाशिंग-मुंडावळ्या' तरी सजतील !
काढ हा नियतीचा घाला 'पांडुरंगा', नाहीतर,
काळ्या मातीत राबणाऱ्याला 'आडमुठ' सारे ठरवतील.
'भुमीपुत्र' म्हणुन घ्यायला उदया, आमची लेकरं तरी कशी धजतील ?
Ekdam mast... You could have also talked about Farmers warriors, their bullocks, who toil days and nights...
ReplyDelete