Thursday, 19 November 2015
Wednesday, 4 November 2015
विचार - एका नव्या सुरुवातीचा
मी विचार केला होता
एका वेगळ्याच शेवटाचा,
पण आता, पायाच
भरावा लागणार आहे,
एका नव्या सुरुवातीचा।
गलबतं तर दिशाहिन
होणारंच, जेव्हा वारेच फिरायला
लागतात,
घरटी पण पोरकी
होणारंच, जेव्हा पाखरंच उडायला
लागतात ।
गावची पायवाटंच बरी होती,
सुखं-दुखात वाटेकरी म्हणुन
का होईना, निदान
वाटसरू तरी असायचे
।
काय अवदशा या महामार्गांची,
राव असो वा
रंक, एकट्यानेच जगायचे
आणि एकट्यानेच मरायचे
।
का नाहीत ढासळणार विश्वासाचे
बुरुज ?
आणखी किती तग
धरावी तरी त्यांनी
?
दौलतीचा डौलबाज गड राखायला,
शिलेदार व्हावं ना साऱ्या
जीवलगांनी ।
वर्षानुवर्षे
जपलेली नाती, आज एका
क्षणात तोडली जातात,
अहंकाराची गाठोडी वाहात, आज
लोक जिवंतपणी मरतात
।
याच साठी का
करतात सारा काही
अट्टहास ?
सारं कळतं, शिवाय नात्यांमधील
मिठहास ।
शेवटी सारं काही
मातीतच जात असलं
तरी,
सद्विचारांचे
थरावर-थर चढवुन,
कर्तुत्वाचा 'टोलेजंग' वाडा मी
बांधणार।
कितीही वादळं आली तरी,
पुन्हा नव्याने कल्पकतेच्या काड्यांनी,
मायेचा खोपा नवा
मी विनणार।
Friday, 23 October 2015
मला कधी कळलंच नाही...
तुझ्यानंतर, तुझ्यासारखं कोणी आयुष्यात कधी आलंच नाही ।।
तुझ्याइतकं मन नंतर कधी कुठे रमलंच नाही ।
पहिल्यासारखं हसू देखील नंतर कधी फुटलंचं नाही ।।
कित्येक दिवस झाले, स्वतःला स्वतःच्या नजरेतुन मी साधं पाहिलं पण नाही ।
कारण, काळोखात बळ देणारा आशावादी ऐनक फक्त तुच होतीस ।।
कित्येक दिवस झाले, खुल्या डोळ्यांनी मी पहाटेचं स्वप्न सुद्धा पाहिलं नाही ।
कारण, सोनेरी पहाटेच्यावेळी लागणारी सुखाची साखरझोप फक्त तुच होतीस ।।
बुचकुळ्यात पडतो मी आजकाल, 'काय तेव्हा करायला हवं होत ?'
वाट्याला जेवढी आली होतीस, त्यालाच गोड मानायला हवं होत ।।
खरंतर मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपायला हवं होत ।
तु वाट चुकली म्हणुन, काटेरी झालंर तुझ्यासमोर अंथरायला मी नको होत।।
आभाळभर मोकळा श्वास घ्यायचाय मला, कायमचा श्वास थांबण्या-अगोदर ।
मनसोक्त बागडायचंय मला 'आयुष्याच्या रंगमंचावर', रंगनाट्य कायमचं संपण्या-अगोदर ।।
काय माहीत, तुझ्याविना हे सारं काही होणार तरी कसं ?
मीठंच हरवलंय आता, काय माहीत आयुष्याचं वरण चवदार लागणार तरी कसं ।।
Tuesday, 8 September 2015
तुला बोलावसं वाटलं.. तरंच बोल...
तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं
सहज एक आठवण
म्हणुन बोलतो.
तुला
आठवतं?
नदीकाठी
आपण फिरायला जायचो,
निळ्याशार
अश्या
पाण्यात
आपली प्रतिमा न्याहाळत
बसायचो.
निळंशार
असं स्वप्न तुझ्या
तांबुस डोळ्यात सजायचं,
आणि
माझ्या अपयशाच्या ओझ्याने ते
नदितंच बुडून जायचं.
आजही
तु अगदी तसंच,
निळ्याशार पाण्यात पाहून इंद्रधनुसारखं
स्वप्न तुझ्या तांबुस डोळ्यात
सजवंत असशील,
नदीकाठा
ऐवजी फक्त एखादा
आकर्षक 'Beach' असेल, फरक एवढाच,
पण, ते स्वप्न त्याच्या
गर्भ-श्रीमंतीच्या वावटळीत
हरवून तर जात
नाही ना ?
तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं
सहज एक आठवण
म्हणुन बोलतो.
तुला
आठवतं?
आपण
देवळात जायचो,
तु
गाभाऱ्यात बसुन असायचीस डोळे मिटून, तासनतास...
माझ्या
यशासाठी गाह्राणं गात बसायचीस.
मी
मात्र देवळाबाहेर तुझी वाट बघायचो,
नशिबापेक्षा
कर्तुत्वावरंच जास्त मी विश्वास ठेवायचो.
नास्तिक
म्हणून, तु सतत माझ्यावर नाराज होत असायचीस.
आजही
तु तशीच कुठेतरी डोळे मिटून बसत असशील, तासनतास...
देवळाच्या
गाभाऱ्या ऐवजी फक्त एखादं महागडं 'Apartment' असेल, फरक एवढाच.
पण
त्या गाह्रान्यांचं काय गं ?
आजही
त्या गाह्रान्यांत, धुरकटसा तरी मी असतो ना ?
तुला
बोलावसं वाटलं.. तरंच बोल,
नाही
म्हणजे.. मी आपलं सहज एक आठवण म्हणुन बोलतो.
Saturday, 29 August 2015
“आयुष्य” हे असंच असतं जगायचं…
गावच्या ऒढ्यात मनसोक्तपणे
पोहायचं,
पेरू-बोरं शोधत शिवारभर
हिंडायचं.
वर्गातील खोड्या-मोड्या
अन दादागिरीलाच प्राथमिक शिक्षण समजायचं,
वर्गाबाहेर मात्र न चुकता
कधी कोंबडा तर कधी पायाचे अंगठे धरून कांगारू बनुन जायचं.
एरवी अपुऱ्या गृहपाठ-वर्गपाठापायी
आई पुढे सतत तोंड लपवायचं,
पण, दसरा-दिवाळीला मात्र
तिच्याचभोवती अगदी मधमाशी सारखं रेंघाळायचं.
मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास
वाट्टेल ते तोडायचं-फोडायचं,
नासधुस पाहुन आईच्या
डोळ्यात जमलेलं पाणी बघुन, स्वतःच पुन्हा तिच्या कुशीत जाऊन 'मुळूमुळू' रडायचं,
मग, गालावरचा एक गोड
पापा अन 'माझं गुणी बाळ ते', ऐकुन भरल्या डोळ्यांनाच हसु फुटायचं.
दिवाळीचा फराळ बनताना
'सुगरण' आईसमोर लगीनघाईगत पुढे-पुढे ‘मी’ करायचं.
सोमवारच्या बाजाराहुन
परतणाऱ्या आज्याचा वाटाड्या ‘मी’ बनायचं,
पिशवीतल्या पेढा-लाडु
अन शेव-चिवड्याला घश्याखाली सरकवून कोवळ्या जीवाला धन्य करायचं.
माजघरातुन बालवाडीच्या
अंगणात उतरायला आजोबाच्या खांद्यालाच 'विमान' बनवायचं,
चुलीवरच्या भाजक्या शेंगदाण्याची
आगाऊ 'मुठ' मिळवायला आजीलांच 'वेठीस' धरायचं.
सीमेवर 'कडा' पहारा देणाऱ्या
'बाबाला', नवी 'सायकल' हवी म्हणुन 'पत्र' लिहायचं,
सणावाराला काका-काकु
सोबत गावी येणाऱ्या मोठ्या भावापुढे, बुद्धीबळ-सापशिडी संचासाठी गाऱ्हाण गायचं.
शाळेपुढच्या पकडा-पकडीत
‘जिंकुन’ सारखं स्वतःच्या चपळाईला नावाजयचं,
तर गल्लीतील सायंकाळच्या
लपाछपित हरवुन, रोज नव्याने स्वतःला शोधायचं.
कधी कविता तर कधी पाढ्यांच्या
घोकमपट्टीतून आपल्या तल्लग बुद्धीचं प्रदर्षण करायचं,
दरवर्षी निकालादिवशी
प्रगती पत्रकावरचा 'प्रथम' क्रमांक घराबाराला दाखऊन, साऱ्यांच्या अंगावर 'मुठभर' मांस
चढवायचं.
शनिवरच्या अर्ध्या दिवसाच्या
शाळेला, मनात नसतानाही पहाटेचं उठायचं,
पण, शाळा सुटतांच, 'शक्तिमान'
बघायला, घराकडे दणाणुन पळायचं.
गुणी-संस्कारी मुलगा
म्हणुन घेण्यापेक्षा ‘गोट्या-कोयांच्या’ खेळातंच अट्टल नेमबाज बनायचं,
इवल्या-बावल्या कारणाहून
गल्ली-बोळात होणाऱ्या मस्तीतुन, ‘आठवडी बाजारासारखं’ एकतरी भांडण विकत घरी आणायचं.
कधी तळ्यात तर कधी मळ्यातल्यासारखं,
कधी आपल्या, तर कधी मामाच्या घरी राहायचं,
ऐन ऋतुमध्ये, पावसाळी
पक्ष्यासारखं आंबा-पेरूच्या बागेतंच रमायचं.
पेरणी-कुळवणी सोबतंच
गाडी-बैला संगत एकरूप व्हायचं,
सणा-सुदीला आमरस-पोळी
आणि आमटी भाताला वरपायचं,
कधी ठेचा तर कधी चटणीने
रब्बीतल्या हुर्ड्याला अधिक चविष्ट बनवायचं.
'मुंबई' पुढे जग संपतं,
यालाच खरं मानायचं,
भुता-प्रेताच्या गोष्टी
ऐकून, ‘अंधारात’ एक साधं पाऊल सरकवायलाही घाबरायचं.
मोठेपणी सुखाच्या नावाखाली
फक्त पैसा कमवत राहायचं,
आणि ज्ञानेश्वरांच्या
सुरात सुर मिसळुन आज, 'लहानपण देगा देवा' असंच म्हणायचं...
खरंच.. आयुष्य हे असंच
असतं जगायचं,
पळता-पळता कधी धापकन
पडायचं.
पण, दुनियादारी ची तमा
न बाळगता, पाठीचा मणका ताठ करून उभं रहायचं,
ताज्या उमेदीचा हंभरडा
फोडुन, पुन्हा एकदा वाऱ्यासारखं धावत सुटायचं.
Friday, 7 August 2015
बळीराजा
राजा कसला ? फक्त बळी उरलोय मी !
रसवंतीतल्या ऊसाचा पार चोथा बनलोय मी.
धनी कसला ? घाण्याला बैलागत जुंपलो गेलोय मी !
बाजारात वारं-वार भावाची खोटी करून घेणारा 'लाचार' झालोय मी.
रात्रं-दिवस रानात घाम मी गाळायचा.
पण भाव मात्र,
गाद्या-गिरध्यावर बसणाऱ्या 'शेठ-साहेबांनी' ठरवायचा !
ऊन-वारा-पावसांत मी खपायचं, मी झटायचं !
रक्ताचं पाणी करून सोनं मी पिकवायचं.
पण शेवटी,
मोटारीतून फिरणाऱ्या सुट-बूट वाल्यांनी भाव पाडून मलाच मातीमोल करायचं !
अजुन किती दिवस मला हे पांढरपेशी लोक किडा-मुंग्यागत गिणतील ?
'बळीराजा' तर सोडाच,
पण कधी मला माणसासारखी तरी वागणुक देतील ?
प्रश्नात्मक साकडं माझं तुला हे भगवंता,
पोरक्या झालेल्या माझ्या सऱ्या केव्हा बरं न्हाऊन निघतील ?
उदंड सामर्थ्य असलेल्या माझ्या मळ्यात, केव्हा बरं 'माणिक-मोती' पिकतील ?
घाई कर रे भगवंता,
डोंगराएवढे प्रश्न माझे क्षणभरात मिटतील.
माझ्या पोटच्या लेकीच्या माथी 'बाशिंग-मुंडावळ्या' तरी सजतील !
काढ हा नियतीचा घाला 'पांडुरंगा', नाहीतर,
काळ्या मातीत राबणाऱ्याला 'आडमुठ' सारे ठरवतील.
'भुमीपुत्र' म्हणुन घ्यायला उदया, आमची लेकरं तरी कशी धजतील ?
Monday, 3 August 2015
माझी चिमुरडी
माझी चिमुरडी, म्हणजे देवाघरचं सर्वात सुंदर फुल ।
हिच्या सोबतीत पडते तहान भुकेचीही भूल ।।
माझी चिमुरडी, म्हणजे विधात्याने सजवलेलं पहाटेचं एक सुंदर स्वप्न ।
हे स्वप्न उलघडण्यातंच सतत, मन माझं असतं मग्न ।।
इवलीशी असल्यापासुन हिच्याशी एकरुप केलंय मी स्वतःला,
चिऊघास-काऊघास भरवून कलेकलेने वाढवलंय मी हिला ।
हिच्या नयनलुब्ध रूपा-समोर हार मानावी लागेल एव्हाना पारीजातकाला,
बागेत स्वच्छंदपणे बागडून लाजवेल ही अगदी फुलपाखराला ।।
लपंडावात रमणारं हिचं हे कोवळं 'मन' एके दिवशी साज-शृंगारात रमेल,
कमालिची धाव घेऊन, सासरी जाऊन आप्तबंधनातही गुंतेल ।
दिवाळीच्या दिव्यासारखं, मायेच्या उबेने दोन्ही घरांना ही दीपवेल,
प्रश्न पडतो एकंच, की 'तेव्हा हिला माझ्यासाठी वेळ उरेल ?'
बागंड सोन्या आत्ताच, फार कठोर आहे हे जग,
नांच 'थुई-थुई' मोरणीसारखी पिसारा फुलवून, मी बनतोय तुझ्या खातीर वसंतातील ढग ।
चिमुरडे, बघ जरा आजमावून…
माझ्या मायेचं कुंपणदेखील उरून पुरेल तुला,
बसं, थोडी काळजी वाटते,
'माझ्या पश्चात सांभाळून घेईल का हे जग तुला ?'
Subscribe to:
Posts (Atom)




