गावच्या ऒढ्यात मनसोक्तपणे
पोहायचं,
पेरू-बोरं शोधत शिवारभर
हिंडायचं.
वर्गातील खोड्या-मोड्या
अन दादागिरीलाच प्राथमिक शिक्षण समजायचं,
वर्गाबाहेर मात्र न चुकता
कधी कोंबडा तर कधी पायाचे अंगठे धरून कांगारू बनुन जायचं.
एरवी अपुऱ्या गृहपाठ-वर्गपाठापायी
आई पुढे सतत तोंड लपवायचं,
पण, दसरा-दिवाळीला मात्र
तिच्याचभोवती अगदी मधमाशी सारखं रेंघाळायचं.
मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास
वाट्टेल ते तोडायचं-फोडायचं,
नासधुस पाहुन आईच्या
डोळ्यात जमलेलं पाणी बघुन, स्वतःच पुन्हा तिच्या कुशीत जाऊन 'मुळूमुळू' रडायचं,
मग, गालावरचा एक गोड
पापा अन 'माझं गुणी बाळ ते', ऐकुन भरल्या डोळ्यांनाच हसु फुटायचं.
दिवाळीचा फराळ बनताना
'सुगरण' आईसमोर लगीनघाईगत पुढे-पुढे ‘मी’ करायचं.
सोमवारच्या बाजाराहुन
परतणाऱ्या आज्याचा वाटाड्या ‘मी’ बनायचं,
पिशवीतल्या पेढा-लाडु
अन शेव-चिवड्याला घश्याखाली सरकवून कोवळ्या जीवाला धन्य करायचं.
माजघरातुन बालवाडीच्या
अंगणात उतरायला आजोबाच्या खांद्यालाच 'विमान' बनवायचं,
चुलीवरच्या भाजक्या शेंगदाण्याची
आगाऊ 'मुठ' मिळवायला आजीलांच 'वेठीस' धरायचं.
सीमेवर 'कडा' पहारा देणाऱ्या
'बाबाला', नवी 'सायकल' हवी म्हणुन 'पत्र' लिहायचं,
सणावाराला काका-काकु
सोबत गावी येणाऱ्या मोठ्या भावापुढे, बुद्धीबळ-सापशिडी संचासाठी गाऱ्हाण गायचं.
शाळेपुढच्या पकडा-पकडीत
‘जिंकुन’ सारखं स्वतःच्या चपळाईला नावाजयचं,
तर गल्लीतील सायंकाळच्या
लपाछपित हरवुन, रोज नव्याने स्वतःला शोधायचं.
कधी कविता तर कधी पाढ्यांच्या
घोकमपट्टीतून आपल्या तल्लग बुद्धीचं प्रदर्षण करायचं,
दरवर्षी निकालादिवशी
प्रगती पत्रकावरचा 'प्रथम' क्रमांक घराबाराला दाखऊन, साऱ्यांच्या अंगावर 'मुठभर' मांस
चढवायचं.
शनिवरच्या अर्ध्या दिवसाच्या
शाळेला, मनात नसतानाही पहाटेचं उठायचं,
पण, शाळा सुटतांच, 'शक्तिमान'
बघायला, घराकडे दणाणुन पळायचं.
गुणी-संस्कारी मुलगा
म्हणुन घेण्यापेक्षा ‘गोट्या-कोयांच्या’ खेळातंच अट्टल नेमबाज बनायचं,
इवल्या-बावल्या कारणाहून
गल्ली-बोळात होणाऱ्या मस्तीतुन, ‘आठवडी बाजारासारखं’ एकतरी भांडण विकत घरी आणायचं.
कधी तळ्यात तर कधी मळ्यातल्यासारखं,
कधी आपल्या, तर कधी मामाच्या घरी राहायचं,
ऐन ऋतुमध्ये, पावसाळी
पक्ष्यासारखं आंबा-पेरूच्या बागेतंच रमायचं.
पेरणी-कुळवणी सोबतंच
गाडी-बैला संगत एकरूप व्हायचं,
सणा-सुदीला आमरस-पोळी
आणि आमटी भाताला वरपायचं,
कधी ठेचा तर कधी चटणीने
रब्बीतल्या हुर्ड्याला अधिक चविष्ट बनवायचं.
'मुंबई' पुढे जग संपतं,
यालाच खरं मानायचं,
भुता-प्रेताच्या गोष्टी
ऐकून, ‘अंधारात’ एक साधं पाऊल सरकवायलाही घाबरायचं.
मोठेपणी सुखाच्या नावाखाली
फक्त पैसा कमवत राहायचं,
आणि ज्ञानेश्वरांच्या
सुरात सुर मिसळुन आज, 'लहानपण देगा देवा' असंच म्हणायचं...
खरंच.. आयुष्य हे असंच
असतं जगायचं,
पळता-पळता कधी धापकन
पडायचं.
पण, दुनियादारी ची तमा
न बाळगता, पाठीचा मणका ताठ करून उभं रहायचं,
ताज्या उमेदीचा हंभरडा
फोडुन, पुन्हा एकदा वाऱ्यासारखं धावत सुटायचं.