Saturday, 14 January 2017

आज पतंग उडवु चला...















सुट्टीच्या या ऊनाड दिवशी,
आज सैराट दौडु चला.
संक्रांतीच्या या मंगल दिवशी,
आज पतंग उडवु चला.

पाठी-दफ्तर घरात फेकुन, 
आज शिवार तुडवु चला,
व्याख्या, सुत्रे, पाढे विसरुन,
आज पतंग उडवु चला. 

माळावरच्या सुसाट नदीत,
आज माश्यागत पोहू चला. 
माळावरच्या हिरव्या धुंदीत, 
आज पतंग उडवु चला. 

रोजच्या हॉर्लिक्स-कॉम्प्लान ऐवजी, 
आज बागेतील पेरू खाऊ चला. 
रोजच्या १० ते ५ शाळे ऐवजी, 
आज पतंग उडवु चला.  











Friday, 13 January 2017

घरटं...











केव्हातरी मला उड़ायचे होते, उंच उंच आकाशामध्ये.
कधीतरी मला भिजायचे होते, चिंब चिंब पावसामध्ये. 


                   कधीवर मी जगायचे होते, काटेरी त्या कुंपनामध्ये? 
                   कुठवर मी रुतायचे होते, दुहेरी त्या आसवांमध्ये?


अजुन किती वहायचे होते, ओझे जड़ त्या नात्यांचे?
अजुन किती खपायचे होते, बंध तुटुनही जिवांचे?


                  कुठवर अजुन चलायचे होते, ठार मारुन मन त्या मनाचे?
                  कुठवर अजुन पळायचे होते, मागे टाकुन क्षण त्या क्षणांचे? 


मलापण आता अडखायचे नव्हते, न टिकलेल्या बंधामध्ये. 
मलापण आता रहायाचे नव्हते, न राहिलेल्या घरटयामध्ये.


                 मला तर आता जिंकायचे होते, न संपणाऱ्या शर्यतीमध्ये. 
                 मला तर आता उड़ायचे होते, न संपणाऱ्या आकाशामध्ये.

Sunday, 1 January 2017

बदलुन टाक तु मला...



तुझ्या फुलांच्या माळानं,
तुझ्या केसांच्या जाळ्यानं,
गुंफुन टाक तु मला. 

तुझ्या कानातल्या बाळीनं,
तुझ्या ओठांच्या लालीनं,
रंगवुन टाक तु मला. 

तुझ्या कोमल स्पर्शानं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावानं,
भिजवुन टाक तु मला. 

तुझ्या गोड हसण्यानं,
तुझ्या प्रेमळ मायेनं,
फुलवुन टाक तु मला. 

तुझ्या खुळ्या नादानं,
तुझ्या करारी बाण्यानं,
जिंकुन टाक तु मला. 

तुझ्या सोज्वळ मनानं,
तुझ्या करून कायेनं,
पावण कर तु मला. 

तुझ्या निःस्वार्थ प्रेमानं,
तुझ्या बांधिल विचारानं,
माणुस कर तु मला. 
    
  
      


   

एक अंधारी वाट...





अंधाऱ्या त्या काळ्या राती,
का मला कशाची भिती?
सोबत असता सावलीची,
मग चिंता कसली काळोखाची?

'गडबडनं अन गोंधळनं',
गाठच नाही या शब्दांशी. 
श्वासागणिक सर करतोय वाट,
घेऊन कंदिल मी हाताशी. 

असतील वाटा काट्या-कुट्यांच्या,
वा असेल कळप साप-विंचवांचा. 
मोडुन क्लुप्त्या शेकडो संकटांच्या,
हा प्रवास नाही आता थांबायचा. 

कधीतरी जिंकेल मी शर्यतीत,
पाऊल टाकतोय, ही गाठ बांधून मनाशी. 
कधीतरी येईल उजेड क्षितिजावर,
चालतोय बाळगुन, ही आस उराशी.