Saturday, 12 December 2015

आम्ही लहानपणी ऐकायचो...










आम्ही लहानपणी ऐकायचो आईकडून,
'बाबा' ऑफिसात काम कि ते करायला जातात. 
दिवस उजाडताच जे उंबऱ्यावर पडतात, 
ते पार, सुर्य मावळल्यावरच त्यांची पाऊले घराकडे वळतात. 
रोजची ही अशी त्यांची दिनचर्या, 
असं वाटतं कि, सुर्याचा वापर ते गजर म्हणुनच करतात. 

आम्ही बापुडे मात्र गजगे, सोंगट्यातच रमणार ना !
आमचं 'काम' ह्या शब्दाशी काय आणि कसलं कर्तव्य ?
बाबा सुद्धा क्रिकेट, बॅडमिंटन मध्ये सवंगडी व्हायचेच म्हणा,
पण आज जाणवतं आम्हाला, बाबांमुळेच तर शिकलोय आम्ही काम आणि कर्तव्य. 

आजही अगदी लख्ख आठवते, आमच्या घरात भरणारी आमची शाळा,
बाबा व्हायचे मास्तर, द्यायला आम्हाला ज्ञान आणि जिव्हाळा. 
आजही आठवतं, कित्येक क्लिष्ट गुंते, त्यांनी अगदी सहज उलघडून आम्हाला उमगावावे,
तर लसावि, मसावि - गुणोत्तर प्रमाण  हे सारं काही रोज अगदी लोणच्यासारखं आमच्या अभ्यासरुपी ताटात वाढवे.
 
लहान असताना कधी वाटलं पण नव्हतं, 
कि तुम्ही पिंजायला शिकवलेले ते ज्ञानाच्या कापसाचे धागे,
पुढे चालून आमच्या आयुष्याचे भक्कम खांब बनतील. 
तर चरित्र, मनन-चिंतन, निर्व्यसनाचे धडे आम्हाला पुर्ण आयुष्यभर पुरतील. 

घरादारासाठी खुप खस्ता खणल्यात तुम्ही मागील कित्येक वर्ष,
फक्त सुखच नव्हे, तर सगळ्यांच्या जीवनात अगदी भरभरून ओतलाय तुम्ही हर्ष. 
आज तुम्ही निवृत्त होताय, 
खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर, आयुष्यातील एक नवं पर्व तुम्ही सुरू करताय. 

तुमचा पुर्ण वेळ आता आम्हा सर्वांना मिळणार, 
हि कल्पनाच अचाट आनंद देणारी आहे. 
काम करून दमलात ना बाबा तुम्ही इतके दिवस,
या आता… विश्रांती घ्यायला घटकाभर,
सारं घर डोळ्याची पार निरांजनं करून तुमची वाट पहात आहे. 
खरंच बाबा, आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्या मुळेच… 



 



 



  
 

Tuesday, 1 December 2015

आत्ताच ऊजाडले होते...












तपभर काळोखानंतर कुठे आत्ताच ऊजाडले होते,
नव्या प्रारंभाचे 'पण' मी आत्ता पहाटेच बांधले होते. 
पुर्णत्वाचे उत्स्फुर्त क्षण मज आत्ताच जगावयाचे होते,
पण, विस्तवांचे लाल भडक ढग नभात, आत्ताच का, जमावयाचे होते ?

हवं तसं जगताच नाही आलं कधी !
जगणे हे फक्त विचारांच्या आराखड्यातच राहिले. 
हवं तसं घरटं विनताच नाही आलं कधी,
विणलेले गवताचे तंतु अहंकारातंच विरले. 


काय होतं माझ्या हातात तरी ?
सद्हेतुपुर्वक समजाविण्यापलिकडे. 
कोणा-कोणाला सावरायचं तरी ?
सारंच वाहतं जेव्हा आवरण्यापलिकडे.         

काळ प्रतारणा करून सहज हसला,
मी मात्र, निमग्नपने वादळांचे 'हलाहल' प्यायलो.
आल्हाददायी वेळ निमुटपणे रुसुन बसला,
मी मात्र, नव्या जोमाने त्याला विनवायला, काथ्याकुट करायला उठलो.